ऑनलाईन टीम / लुधियाना :
कोरोनाच्या महामारीच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह आता पंजाबमध्ये देखील ब्लॅक फंगसचे 100 रुग्ण समोर आले आहेत. प्रदेशात यावरील औषधच उपलब्ध नसल्याने ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार देखील होऊ शकत नाही आहेत; अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री बलबिर सिंह सिंह यांनी सोमवारी दिली.
ते म्हणाले, राज्यात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 100 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यावरील औषध देखील उपलब्ध नसल्याने मोठी समस्या जाणवत आहे. तर लुधियानामध्ये एका रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. तर भटींडा जिल्ह्यात आता पर्यंत 27 जणांना याची लागण झाली आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या मते यातील 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या या रुग्णांपैकी 4 जणांची सर्जरी करण्यात आली आहे. तर एक रुग्ण बरा झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर व्यवस्थित उपचार झाले पाहिजेत यासाठी मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. आर. पी. एस. सीबिया यांच्या मार्गदर्शनाखाली 5 सदस्यांची एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ही कमिटी पंजाबमधील रुग्णालयात दाखल असलेल्या ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार करताना काही समस्या आल्यास त्याचे निवारण करणार आहे.