प्रतिनिधी / बेळगाव
कोविड-19 मुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाबाधितांसाठी 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महापालिकेला देऊ केले आहेत. यावेळी कंपनीच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते महापालिका आयुक्तांकडे कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले.
शहरात कोरोनाचा उदेक वाढत असून दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. पण ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. काही रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने तसेच ऑक्सिजनअभावी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सध्या रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालय आवारात ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्याचे काम सुरू केले आहे. पण सध्या कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन अत्यावश्यक असल्याने कॉन्सन्ट्रेटरचा आधार घेण्यात येत आहे.
महापालिकेने देवराज अर्स हॉस्टेल, हनुमाननगर तसेच रामतीर्थनगर परिसरात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. एकूण 350 बेड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दाखल करण्यात येणाऱया कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळे शहरवासियांची गरज ओळखून कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देऊ केले आहेत. याचा वापर गरजूंसाठी करण्यात येणार आहे. यावेळी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दिलीप चांडक, सदस्य अनिश मेत्राणी, सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर आदींच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यासाठी जयभारत फौंडेशन (अशोक आयर्न ग्रुप), वेगा ऑटो अक्सेसरीज, स्नेहम फैंडेशन (स्नेहम इंटरनॅशनल), रेक. फ्लो इंजिनिअरिंग, शांती फौमॅक, ओरिअन हॅड्रोलिक्स, केशव सिमेंट व इन्फ्रा, नेतलकर इंजिनिअर्स, वॉलक्राफ्ट इंजिनिअर्स आदी कंपन्यांनी सहकार्य केले आहे.