नफा वसुलीचा बाजारात प्रभाव – एचडीएफसी बँक तोटय़ात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात(बीएसई) मागील दोन दिवसांच्या तेजीला अखेर पूर्णविराम मिळाला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक काही प्रमाणात घसरण होत बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील मजबूत कल आणि कोविड संसर्गामध्ये होत असणाऱया घसरणीचा सकारात्मक बदल दिसत आहे.
मंगळवारच्या सत्रात एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांच्या समभागात नफा कमाईमुळे घसरण नोंदवली आहे. सेन्सेक्स दिवसअखेर 14.37 अंकांसह 0.03 टक्क्यासोबत घसरुन निर्देशांक 50,637.53 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10.75 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 15,208.45 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग 2.02 टक्क्यांनी घसरले असून अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि आयटीसीसह अन्य समभाग घसरणीत राहिल्याची नोंद केली आहे. दुसऱया बाजूला एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक 3.38 टक्क्यांनी वधारले. तर टायटन, बजाज फिनसर्व्ह, ओएनजीसी, इन्फोसिस, टीसीएस आणि पॉवरग्रिड सह अन्य कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.
प्रमुख क्षेत्रांचा कल
देशातील शेअर बाजारात बँक आणि आर्थिक कंपन्यांचे समभाग मागील दोन दिवसांमध्ये जोरदार तेजी दाखवत होते. यातून नफावसुली झाली आहे. यावेळी अन्य समभाग सकारात्मक स्थितीत राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. धातु क्षेत्रातील समभागात दोन दिवसात आलेल्या घसरणीनंतर मोठी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. कारण या क्षेत्रातील कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे नफा कमाईचे आकडे सकारात्मक राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये रुची वाढत गेल्याचेही नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकीओमध्ये तेजी राहिली आहे. युरोपच्या प्रमुख बाजाराने प्रारंभीच्या दरम्यान तेजी प्राप्त केली आहे.