प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या तीव्र लाटेने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे औषधांची मागणीही वाढू लागली आहे. गरीब रुग्णांना औषधे घेणे परवडणारे नसल्याने बेळगाव जिल्हा केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट वेल्फेअर असोसिएशनतर्फे अंदाजे दोन लाखांहून अधिक किमतीची औषधे मंगळवारी जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आली.
बेळगाव जिल्हय़ात होलसेल व रिटेल केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांची एकूण संख्या अडीच हजारहून अधिक आहे. गरीब रुग्णांसाठी औषधांची तीव्र गरज भासल्याने जिल्हाधिकाऱयांनी असोसिएशनला औषधे देण्याबाबत ड्रग कंट्रोलर सुनील गायकवाड व एन. व्ही. रघुराम यांना विनंती केली होती. त्यांनी केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांना विनंती केली.
असोसिएशनने अवघ्या एक दिवसात सभासदांशी संपर्क साधून औषधे देण्याबाबत चर्चा केली. सर्व सभासदांनी या प्रस्तावाला मान्यता दिली व मंगळवारी जिल्हय़ातील केमिस्ट व ड्रगिस्ट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. सर्वांच्या उपस्थितीत अंदाजे 2 लाखांहून अधिक किमतीची औषधे जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आली.
यामध्ये व्हिटॅमिन सी, डी व झिंक, मास्क, पॅरासिटामॉल, कोरोनावर उपचार करण्यासाठी आवश्यक अशी औषधे, गोळय़ा व इंजेक्शन यांचा समावेश आहे. ड्रग कंट्रोल खात्याचे साहाय्यक संचालक रघुराम यांच्या उपस्थितीत ही औषधे जिल्हाधिकाऱयांकडे देण्यात आली.
सामाजिक बांधिलकी म्हणून अत्यंत कठीण काळात केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने ही मदत केली आहे. याच पद्धतीने त्यांनी जनकल्याण ट्रस्ट व अंजुमन संस्थेलाही मदत केली आहे. याबद्दल आपण कृतज्ञ आहोत, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष एस. जी. गडियण्णवर, खजिनदार बसवराज कुडचीमठ, उपाध्यक्ष गंगाधर तुरमनंदी, वीरेश कित्तूर, केशव कुलकर्णी, सहसचिव महावीर नंदगावे, सतीश सवदी यांच्यासह जिल्हय़ातील प्रतिनिधी उपस्थित होते.