बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मंगळवारी या वर्षाच्या १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारने द्वितीय पीयू परीक्षा कशा घ्याव्यात याविषयी यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी, “राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि भविष्याच्या हिताच्या दृष्टीने लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.” असे म्हंटले आहे. शिक्षणमंत्री लवकरच अधिकारी आणि आरोग्य तज्ज्ञांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, कर्नाटक सरकारनेही या वर्षाच्या अखेरीस बोर्ड परीक्षा घेण्यापूर्वी द्वितीय पीयू विद्यार्थ्यांना कोविड -१९ लस देण्याची चाचपणी केली होती. “काही तज्ञांनी विद्यार्थ्यांचे करण्याची शिफारस केली आहे. तसेच लसीकरणाबाबत आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे कुमार म्हणाले होते.