प्रतिनिधी / कुपवाड :
कानडवाडी गावातील एका घराच्या आडोशाला देशी दारुची बेकायदा विक्री करताना रंगेहाथ पकडून कुपवाड पोलिसांनी एकास अटक केली.
यामध्ये राजकुमार आण्णाप्पा कांबळे (५५) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. राजकुमार कांबळे हे कानडवाडी गावचे माजी उपसरपंच आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे कानडवाडी गावात चर्चेचा विषय रंगला आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील ५ हजार ३५० रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानडवाडी येथील एका घराजवळ देशी दारूची बेकायदा विक्री सुरू असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता संशयित राजकुमार कांबळे हा देशी दारूची विक्री करीत असताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याच्याजवळील ५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.