प्रतिनिधी / वास्को
गोव्यानजीकच्या खोल समुद्रात अडचणीत सापडलेल्या एका व्यापारी जहाजातील अधिकाऱयाला भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाने त्वरीत बचाव कार्य हाती घेऊन गोव्यात आणले व वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. सदर अधिकारी आता सुरक्षीत आहेत.
मुंबईच्या बचाव समन्वय केंद्राकडून तटरक्षक दलाच्या गोवा विभागाला रविवारी सकाळी साडे चारच्या सुमारास एका आपत्कालीन सेवा कार्यासाठी संदेश आला होता. गोव्या जवळच्या खोल समुद्रात एका व्यापारी जहाजाचा मास्टर अत्यवस्थ झाला होता. त्याला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज होती. त्यामुळे दलाच्या एका पथकाने गस्ती जहाजावरून घटनास्थळी कुच केली. सकाळी दहाच्या सुमारास हे जहाज घटनास्थळी दाखल झाले. त्या अधिकाऱयाला जहाजात घेऊन हे जहाज अकराच्या सुमारास गोव्याकडे येण्यास निघाले. मात्र, तातडीच्या उपचारांची आवश्यकता असल्याने तटरक्षक दलाच्या हवाई जहाजाची मदत घेण्यात आली. हवाई जहाज दाखल होताच त्याला जहाजावरून हेलिकॉप्टरमध्ये उचलण्यात आले व गोव्यात आल्यावर त्याला वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यात आले.