ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडी उमेश कामत आणि मुक्ता बर्वे तब्बल 8 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सोनी मराठीवर नव्याने सुरू होत असलेल्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत हे दोघे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी मुक्ता आणि उमेश हे दोघे लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र दिसले होते.
मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली.
उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असे वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. ही मालिका 12 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.