प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव हे उद्या गुरुवार दि. 17 जून रोजी 4 दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून ते पक्ष संघटना बळकट करण्यासाठी गाठी-भेटी घेणार आहेत, तसेच काही मतदारसंघाचा दौराही करणार आहेत. शिवाय 18 जून रोजी गोव्यातील क्रांतिदिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
काँग्रेस पक्षातर्फे मडगाव येथे क्रांतिदिनाच्या 75 वर्षांनिमित्त विशेष कार्यक्रम आखण्यात आला असून तेथेही ते हजेरी लावणार आहेत. राज्यातील 40 मतदारसंघातील गटाध्यक्षांना ते भेटणार असून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यावरही ते भर देणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद तसेच विविध पदाधिकारी यांचाही ते विचार करणार असून त्यात बदल करतील, अशी अपेक्षा काँग्रेस वर्तुळात आहे.
दरम्यान, गुंडूराव यांनी ऑनलाईन पद्धतीने काँगेस पक्षाच्या विविध विभागांच्या प्रमुख नेत्यांशी पदाधिकाऱयांशी बैठका घेऊन चर्चा केली आणि जनतेमध्ये जाऊन पक्ष संघटना-विभाग मजबूत करावे, असा सल्ला दिला आहे. काँग्रेस पक्षाला गोव्यात मोठा आणि चांगला जनाधार असून फक्त जनतेकडे जाण्याची गरज आहे, व त्यांचे प्रश्न समस्या हाताळण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
गोवा प्रदेश महिला काँग्रेसने महिलांचे विषय हाती घ्यावेत. महागाई, सिलिंडर दरवाढ, महिला योजनेतील आर्थिक लाभ न मिळणे हे विषय घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, युवक काँग्रेसने बेकारी, भ्रष्टाचार, गैरकारभार हे विषय घेऊन आंदोलने करावीत आणि सरकारला जाब विचारावा, अशी सूचना गुंडूराव यांनी केली. विद्यार्थी वर्गाचे प्रश्न- परीक्षा व इतर विषय एनएसयूआयने हाताळावेत, असेही त्यांनी नमूद केले. संलग्न विभागांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले आहे.