बेकायदा वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ : वाहनांमध्ये बदल घडवून तस्करी, अबकारी विभागाच्या डोकेदुखीत भर
बेळगाव : बेळगावला आणि बेळगावमार्गे होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी अबकारी विभागाने कंबर कसली आहे. तरीही गोवा बनावटीच्या दारूची वेगवेगळ्या राज्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. कर्नाटकात दारूवरील करवाढ केल्यानंतर गोवा बनावटीच्या दारूला मागणी वाढली आहे. कारण ती सहज आणि स्वस्तात मिळते. बेळगावमार्गे होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान अबकारी विभागासमोर आहे. शनिवारी पहाटे अबकारी अधिकाऱ्यांनी हलगा येथील सुवर्ण विधानसौधजवळ ट्रकमधून उत्तर प्रदेशला नेण्यात येणारी 28 लाख 4 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी वाराणसी येथील वीरेंद्र मिश्रा (वय 34) या युवकाला अटक केली आहे. अबकारी विभाग जसे कारवाई तीव्र करते, तसे गुन्हेगारही आपल्या कार्यपद्धतीत कसे बदल करतात? हे शनिवारच्या कारवाईवरून दिसून आले. ट्रकमधून प्लायवूडची वाहतूक करण्यात येत असल्याचे भासविण्यात आले होते. पाठीमागील बाजूला प्लायवूड भरण्यात आला होता. त्याच्यानंतर प्लायवूडमधून दोन कप्पे तयार करून त्या कप्प्यात गोवा बनावटीची दारू ठेवण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी तर अबकारी अधिकाऱ्यांनाही कळू नये, अशा पद्धतीने ट्रकमध्ये वेगळे कप्पे तयार करण्यात आले होते.
बेळगाव दक्षिण विभाग अबकारी कार्यक्षेत्रात येणाऱ्या कणकुंबी येथील तपासनाक्यावर गोव्याहून येणाऱ्या वाहनांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासनाके पार करणारी वाहने काही वेळा इतर ठिकाणी सापडतात. अबकारी विभागाने केवळ बेळगाव व खानापूर तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बेकायदा दारू थोपविण्यासाठी 3215 ठिकाणी छापे टाकले आहेत. या काळात एकूण 1500 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ अबकारी विभागच नव्हे तर स्थानिक पोलीसही बेकायदा दारू थोपविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. सदाशिवनगर येथील एका फ्लॅटवर छापा टाकून बेकायदा दारू तयार करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. या टोळीतील गुन्हेगारही गोव्यातून दारू मागवतात. स्वस्तातील दारू महागड्या बाटलीत भरून त्याची विक्री करतात. गोवा बनावटीची दारू विकणाऱ्या टोळ्या बेळगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अधूनमधून त्यांच्यावर कारवाई होते. कारवाईनंतर लगेच ते पुन्हा पूर्वीसारखेच दारूविक्रीला सुरुवात करतात. बेळगाव दक्षिण विभागाचे अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, उपअधीक्षक रवी मुरगोड व त्यांचे सहकारी बेकायदा दारू वाहतूक व व्यवसाय थोपविण्यासाठी कार्यरत असतात. गेल्या आठ महिन्यांतील आकडेवारी लक्षात घेता गोवा बनावटीची दारू वाहतूक किती प्रमाणात होते हे लक्षात येते. 1 जानेवारी 2023 पासून 31 ऑगस्टपर्यंत 1510 प्रकरणे दाखल करून 4,377 जणांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदा दारू वाहतूक करणारी 98 वाहने जप्त
बेकायदा दारू वाहतूक करणारी वाहनेही अबकारी कायद्यांतर्गत जप्त केली जातात. गेल्या आठ महिन्यांत केवळ बेळगाव व खानापूर या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या अबकारी दक्षिण विभागात 79 दुचाकी, 1 ऑटोरिक्षा, 11 कार, 5 ट्रक, 2 बाराचाकी ट्रक अशी 98 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या काळात अबकारी विभागाने एकाही प्रकरणात बनावट दारू जप्त केली नसली तरी बेळगाव शहर पोलिसांनी मात्र एका अ•dयावर छापा टाकून बनावट दारू जप्त केली आहे. या कारवाईत 10,158.4 लिटर परराज्यातील दारू, 163.3 लिटर फेणी, 18,890 लिटर बियर, 86 लिटर शिंदीची दारू, 10 लिटर 51 मिली वाईन जप्त करण्यात आली आहे. बेकायदा दारूबरोबरच गावठी दारूविरोधातही कारवाई करून 931 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून 59 लिटर गोव्याची हुर्राकही अबकारी विभागाने जप्त केली आहे. या कारवाईपाठोपाठ लगेच सप्टेंबरच्या सुरुवातीलाच 28 लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा हलग्याजवळ जप्त करण्यात आला आहे. अबकारी विभागाचे उपअधीक्षक रवी मुरगोड यांनी ही माहिती दिली आहे.
करवाढीनंतर मागणी वाढली
बेळगावात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री होते. तपासनाक्यांवर वाहने अडवून तपासणी करूनही काही वेळा त्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत तर आणखी काही वेळा त्यांच्याशी संधान बांधून वाहने तेथून बाहेर पडतात. आधीपासून बेळगाव शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू विकली जाते. राज्य सरकारने 20 टक्के करवाढ केल्यानंतर स्वस्तात मिळणाऱ्या गोवा दारूला मागणी वाढली आहे. ती थोपविण्याचे आव्हान अबकारी विभागाबरोबरच पोलीस दलासमोरही आहे.