सूदानमध्ये गोरक्षणासाठी हाती घेतात शस्त्र
हिंदू धर्मात गायीला देवता अन् मातेचा दर्जा देण्यात आला आहे. अशा स्थितीत भारतीय संस्कृतीत गोरक्षा आणि गायीशी निगडित अनेक गोष्टींना मोठे महत्त्व आहे. आमच्या देशात अनेक लोक गोमुत्र प्राशन करत असतात. परंतु भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावरील एका देशात राहत असलेला आदिवासी समुदाय गोमुत्राने आंघोळ करत असतो. या समुदायाचे लोक गायीची देखभाल स्वतःच्या मुलांपेक्षा अधिक काळजीपूर्वक करत असतात.
दक्षिण सूदानमध्ये राहणारा मुंदारी समुदाय स्वतःच्या गोप्रेमासाठी जगप्रसिद्ध आहे. मुंदारी समुदायासाठी त्यांची गाय हीच सर्वस्व आहे. गायीच्या रक्षणासाठी प्रसंगी शस्त्र हाती घेण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. सूदानमध्ये दरवर्षी 3 लाखाहून अधिक गायींची चोरी होते आणि गायींच्या चोरीवरून होणाऱया भांडणांदरम्यान 2500 लोकांना जीव गमवावा लागत असतो.
मुंदारी समुदायाच्या लोकांमध्ये गोमुत्राने आंघोळ करण्याची प्रथा आहे. गोमुत्रामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने याची आंघोळ केल्यास शरीर शुद्ध होत असल्याचे या समुदायाचे मानणे आहे. या समुदाता गाय केवळ प्राणी असून लोकांसाठी सन्मान, प्रतिष्ठा अन् संपदेचे प्रतीक आहे. या समुदायाचे लोक गायीच्या शेणापासून तयार झालेली राख स्वतःच्या शरीरावर फासत असतात.
या समुदायात गायीचे मोठे महत्त्व असल्याने त्यांच्या रक्षणासाठी लोक संघर्ष करण्यास तयार असतात. या समुदायात लोक गायींना स्वतःच्या मुलांप्रमाणे पाळत असतात. लोक येथे गायींसोबतच राहत असतात. तसेच एखाद्या व्यक्तीकडे गायींचे प्रमाण अधिक असल्यास त्याला हवे तितके विवाह करण्याची मुभा असते.