ओटवणे /प्रतिनिधी-
माजगाव उद्यमनगर नजिक मुंबई – गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी चालत्या कंटेनरचा टप आंब्याच्या फांदीला लागून कंटेनरच्या दर्शनी भागावरच आंब्याचे झाड कोसळले. सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही मात्र कंटेनरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. या घटनेत सुमारे एक तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बांदा येथे एका कारला घडक देत भरधाव येणारा अवजड कंटेनर माजगाव येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी गवस यांच्या घराच्या कंपाऊंड नजिक आला असता कंटेनरचा टप रस्त्यालगतच्या आंब्याच्या मोठया फांदीला धडकला. त्यामुळे कंटेनरच्या दर्शनी भागावरच आंब्याचे झाड कोसळले. भर रस्त्यावरच हे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे एक तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी कटरच्या साह्याने हे झाड कापून महामार्ग वाहतुकीचा मोकळा केला. दरम्यान या कंटेनर चालकाने गोवा येथून येताना बांदा – इन्सुली दरम्यान एका कारला धडक देत पलायन केले होते. त्यामुळे भरधाव वेगाने येत असतानाच या कंटेनुसार तप आंब्याच्या झाडाला धडकला.यावेळी बांदा आणि इन्सुली ग्रामस्थांनी या कंटेनर चालकाला जाब विचारत धारेवर धरले तसेच त्याला घटनास्थळी पुन्हा घेऊन गेले.