ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दहिसरमध्ये बॅनरवरुन झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. कोयत्याने हल्ला झाल्यामुळे वारे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
नितेश उतेकर, आशिष नायर, सोनू पालांडे, मयूर वाघेला, सुनील मांडवे, समीर कोटी, अनिल दबडे यासह अन्य एकावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अनिल दबडे आणि सुनील मांडवे यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारे हे मागील 26 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत काम करत होते. मात्र, त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. याचाच राग शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये होता. दहिसरमधील एका बॅनरवरुन या वारे यांच्यासोबत या कार्यकर्त्यांचा वाद झाला. त्यातूनच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वारे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात वारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीला, खांद्याला आणि छातीला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक वाचा : राऊतांना ‘ते’ ट्विट भोवलं; बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी वारे यांची रुग्णालयात भेट घेऊन चौकशीची विचारपूस केली. यावेळी हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.