अर्थसंकल्प बैठक नव्हे, तर सूचना मांडण्यासाठी बैठकीचे आयोजन : बैठकीपूर्वी सात दिवस आदी नोटीस बजावावी
बेळगाव : महापालिकेच्या अर्थसंकल्पाची बैठक अचानकपणे आयोजित करण्यात आली. नेमकी बैठक कशासाठी? याची कल्पना नगरसेवकांना नव्हती. केवळ अर्थसंकल्पीय बैठक असे सांगण्यात आल्याने मनपाचा अर्थसंकल्प आज मांडणार, अशी माहिती उपलब्ध झाली. मात्र ही बैठक केवळ सूचना मांडण्यासाठी असल्याचे महापौर शोभा सोमनाचे यांनी स्पष्ट केले व केवळ अर्थसंकल्पाबाबत सूचना मांडण्याचे आवाहन नगरसेवकांना केले. महापालिका अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. अर्थसंकल्प मांडण्यासाठी केवळ तारखेची घोषणा होणे शिल्लक आहे. मात्र सोमवारी बैठक आयोजित करून अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन करण्यात आल्याने सर्वच अचंबित झाले. शनिवारी सायंकाळपर्यंत बैठकीबाबत कोणत्याच नगरसेवकाला माहिती देण्यात आली नाही. रविवारी दुपारपर्यंत सर्व नगरसेवकांना मोबाईलद्वारे आणि व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज पाठवून अर्थसंकल्प बैठक असल्याचे कौन्सिल विभागाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारची बैठक अर्थसंकल्पीय बैठक असल्याचा समज नगरसेवक आणि पत्रकारांचा झाला. पण बैठक सुरू झाल्यानंतर केवळ सूचना मांडण्यासाठी ही बैठक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्प तयार करण्यात येणार असून यामध्ये कोणत्या तरतुदी कराव्यात याची माहिती नगरसेवकांनी आपल्या सूचनांच्या माध्यमातून करावी, असे सांगितले. मात्र यावेळी नगरसेवकांनी बैठकीबाबतची नोटीस मिळाली नसल्याबद्दल आक्षेप घेतला. किमान सात दिवस आदी बैठकीची नोटीस बजावण्यात यावी, अशी सूचना मांडली. कोणतीही बैठक आयोजित करण्यापूर्वी नियमानुसार सात दिवस आदी नोटीस बजावणे बंधनकारक आहे. आपत्कालीन चर्चा असल्यास तातडीची नोटीस बजावून बैठक बोलाविता येऊ शकते. पण गेल्या दोन महिन्यांपासून अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना अचानक बैठक आयोजित करण्यात आली. यापुढे बैठक आयोजित करण्यापूर्वी सात दिवस आदी नोटीस बजावण्यात यावी, अशी सूचना नगरसेवक रवी साळुंके, आजिम पटवेगार, मुज्जमिल डोणी, शाहिदखान पठाण आणि शंकर पाटील यांनी केली.