ज्याच्याजवळ आलिशान कार, मोठे घर आणि जमीनजुमला आहे, अशी व्यक्ती श्रीमंत समजली जाते. पण ती रोज भीक मागून आपली गुजराण करीत असेल असे आपल्या स्वप्नातसुद्धा येणार नाही. तथापि, अबुधाबीमधील एक महिला अशा प्रकारचे जीवन व्यतित करत आहे. पोलिसांनी नुकतीच या महिलेला अटक केलेली असून तिच्या संपत्तीची मोजदाद सुरू आहे. तिच्याजवळ एक लक्झरी कार, 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूही मिळाल्या आहेत.
ही महिला दिवसभर अबुधाबीतील वेगवेगळय़ा मशिदी आणि इतर ठिकाणी भीक मागण्याचे काम करते. भीक मागण्यासाठी ती दिवसभर वणवण भटकते. जवळपास दहा वर्षे तिने हा उपक्रम चालविला आहे. कालांतराने पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. ही महिला आपल्या घरातून लक्झरी कारमधून बाहेर पडते. शहरात कोठे तरी कार पार्क करते आणि दिवसभर पायी चालत भीक मागते आणि रात्री कारने आपल्या घरी जाते, असे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. भीक मागून घरी गेल्यानंतर ही महिला आपले फाटके आणि मळलेले कपडे बदलून महागडा पोशाख परिधान करते. तसेच सकाळी भीक मागण्यापूर्वी तो पोशाख बदलून जुनाट आणि फाटकी वेशभूषा करते, असेही तपासात आढळून आले. विशेष म्हणजे संयुक्त अरब अमिरातीत भीक मागण्यावर बंदी आहे. भीक मागण्यासाठी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तसेच किमान पाच हजार दिरहॅम दंड केला जातो. असे असूनही या महिलेने दहा वर्षे पोलिसांना गुंगारा कसा दिला, याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. तसेच ही महिला इतकी संपत्ती असूनही भीक का मागत होती, हे कोडे अद्याप उलगडलेले नाही. पोलीस तपासात त्यावर प्रकाश पडू शकेल, असे दिसते. अबुधाबीत आतापर्यंत गेल्या दहा वर्षात दोनशे भिकाऱयांना शिक्षा करण्यात आली आहे. तथापि, कोणाही जवळ या महिले इतकी संपत्ती सापडलेली नाही. त्यामुळे तिचा उल्लेख सर्वात श्रीमंत भिकारी असा केला जातो. तिचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. तपासानंतर ते उघड केले जाण्याची शक्मयता आहे.