पृथ्वीवर आता क्वचितच असे स्थान शिल्लक उरले असेल की जे मानवाला अज्ञात आहे. बहुतेक ठिकाणी मानव पोहचलाच आहे. मात्र, तरीही अशी काही स्थाने अजूनही सापडत आहेत, की ज्यावर मानवाची दृष्टी अद्याप पडलेली नाही. अमेरिकेच्या न्यू मॅक्सिको या प्रांतामध्ये नुकताच एका गुहेत दडलेल्या रहस्यमय तलावाचा शोध लागला आहे. हा तलाव 700 फूट खोलवर असून तो दुधासारख्या पांढऱ्या द्रवपदार्थाने भरलेला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कार्ल्सबॅड कॅव्हर्न्स अभयारण्याचा कर्मचाऱ्यांना या तलावाचा शोध लागला आहे. त्यांनी तो रहस्यमयी असल्याचे घोषित करुन टाकले आहे. हा तलाव अत्यंत प्राचीन असून आजवर तो कोणालाही माहीत नव्हता असे काही जणांचे म्हणणे असले तरी तो प्राचीन काळी प्रसिद्ध होता. मात्र, कालांतराने त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आणि तो विस्मृतीत गेला असेही काही जाणकारांचे मत आहे. मात्र, सध्या त्याचा अभ्यास करण्यात येत असून लवकरच त्याची अधिक माहिती दिली जाईल. या तलावाला द्रवरुप आकाश सरोवर (लिक्विड स्काय लेक) या नावाने संबोधण्यात येत आहे. प्राचीन कथांच्या आधारे याचा शोध घेण्यात येत होता. पण यश येत नव्हते. 1993 मध्ये त्याचा प्रथम शोध लागला. नंतर त्याचा आणखी शोध घेण्यात आल्यानंतर त्याची माहिती मिळाली. या तलावाला जोडली गेलेली अनेक भुयारेही आता सापडली आहेत. प्राचीन काळी याच भुयारांमधून या तलावाचे स्वच्छ पाणी लोकांना पुरविले जात असावे असेही बोलले जात आहे.