आफ्रिका खंडाचे होणार दोन तुकडे
भूगभांत सातत्याने हालचाली होत असतात. याच हालचाली वरच्या बाजूला जमीन असणार का पाणी हे ठरवत असतात. आता आफ्रिकेवरून जियोलॉजिस्ट्स तेथे काही मोठे घडत असल्याचे मानत आहेत. जियोफिजिकल रिसर्च लेटर्स या विज्ञान विषयक नियतकालिकाता अध्ययन प्रकाशित झाले असून यात आफ्रिकेची दोन तुकडे होणार असल्याचे म्हटले गेले आहे. केनियाच्या नैरोबी-नारोग महामार्गानजीक अनेक किलोमीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. यापूर्वी इथियोपियाच्या अफार क्षेत्रातही 2005 मध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. तेव्हा केवळ 10 दिवसांमध्ये या दरीचे अंतर 56 किलोमीटर इतके झाले होते.
आफ्रिका खंड दोन तुकडय़ांमध्ये विभागण्याची सुरुवात झाली आहे. सर्वसाधारपणे अशाप्रकारचे कुठल्याही बदलाला मोठा वेळ लागतो, परतु स्थिती लवकरच बदलेल असे वाटत असल्याचे भूगर्भ वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
पूर्वी देखील घडलंय
जगात जेव्हा पहिल्यांदा नकाशे तयार होऊ लागले, तेव्हा भ्रमंती करणाऱया लोकांना एक गोष्ट निदर्शनास आली होती. अनेक दुर्गम खंड आणि देशांमध्ये अनेक समानता होत्या, म्हणजेच आफ्रिकेचा दक्षिण-पश्चिम हिस्सा आणि दक्षिण अमेरिकेचा उत्तर-पूर्व हिस्सा एकसारखाच वाटत होता. या दोन्ही हिस्स्यांना परस्परांशी जोडले तर एकदम जुळून जातील असेही आढळून आले. बहुधा भूगर्भीय हालचालींमुळेच हे भाग वेगळे झाले असावेत असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तविला होता.
कशाप्रकारे होणार बदल?
दीर्घ काळानंतर 50 च्या दशकादरम्यान मॅग्नेटिक सर्व्हे नावाचे तंत्रज्ञान विकसित झाले. याद्वारे भूगर्भातील हालचालींबद्दल कळत होते. ज्याला प्लेट टॅक्टॉनिक्स थेअरी हे नाव मिळाले. यानुसार पृथ्वीवरील समुद्र हटविण्यात आल्यास पृथ्वी काही प्लेट्समध्ये विभागलेली आहे. हे प्लेट्स हालचाली करत असतात. यांचा वेग मात्र वेगवेगळा असतो. यातील काही हालचाली भूकंप आणि ज्वालामुखीच्या विस्फोटासाठी जबाबदार असतात. अनेक ठिकणवर प्लेट्समधील हालचाल अधिक असते. या ठिकाणांना नैसर्गिक आपत्तींसाठी संवेदनशील म्हटले जाते. ज्या ठिकाणांवर टेक्टॉनिक प्लेट्स दूर जात आहेत, त्यांना रिफ्ट व्हॅली म्हटले जाते. आफ्रिकेत प्लेट्स दूर जात असल्याने भूगर्भशास्त्राला याला ग्रेट रिफ्ट व्हॅली मानले जात आहे.
विभागणारे जग
संबंधित तंत्रज्ञान विकसित झघ्लयावर भूगर्भशास्त्रज्ञांना कशाप्रकारे पृथ्वी वेगवेगळय़ा खंडांमध्ये विभागली असावी हे समजले. सुमारे 180 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवाना नावाचा महाखंड होता, यात आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिटका यासारखे खंड सामील होते. ज्युरासिक पीरियडमध्ये गोंडवानाचा पश्चिम हिस्सा (आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका) पूर्व हिस्स्यापासून वेगळा झाला. यानंतर 140 दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकाही विभागले गेले आणि यामुळे अटलांटिक महासागर अस्तित्वात आला.
आफ्रिकेच्या विभागणीला किती वेळ लागणार?
आफ्रिकेचे दोन तुकडे होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने होत असली तरीही याला लाखो वर्षे लागणार ओत. सध्या अनुमानानुसार सुमारे 5 ते 10 दशलक्ष वर्षांमध्ये असे घडू शकते. यामुळे सोमालिया, केनिया, इथियोपिया आणि टांझानिया हे उर्वरित खंडापासून वेगळे होतील. दोन्ही हिस्स्यांदरम्यान समुद्र असणार आहे. यातील अनेक देश हे बेटसदृश ठरण्याचीही शक्यता आहे.