वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या सध्या सुरु असलेल्या प्राथमिक संयुक्त दुसऱ्या फेरीतील पात्रतेच्या सामन्यांसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 26 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. भारतीय फुटबॉल संघाचे पात्र फेरीतील हे सामने कुवेत आणि कतार यांच्याबरोबर होणार आहे.
या पात्र फेरीच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये मिझोरामचा 23 वर्षीय डेव्हिड लाललेनसेंगाला संधी प्रशिक्षक स्टिमॅक यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे आयझॉल एफसी संघातील एल लालबिकानिया यांचाही संघात समावेश आहे. रियल काश्मिर संघातील मोहम्मद हमाद, इंटरकाशी संघातील एडमंड एल., यांना या पात्र फेरीच्या स्पर्धेसाठी संभाव्य संघात स्थान देण्यात आले आहे. भारत आणि कुवेत यांच्यातील हा पात्र फेरीचा सामना 6 जूनला कोलकाता येथे तर त्यानंतर 11 जूनला डोहा येथे दुसरा सामना कतार बरोबेर होणार आहे. निवडण्यात आलेल्या 26 सदस्यांच्या फुटबॉल संघाला 10 मे पासून भुवनेश्वरमध्ये सराव शिबिराला प्रारंभ होईल. फिफाच्या आगामी पात्र फेरी स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश आहे. भारताने या गटातून सध्या दुसरे स्थान मिळविले आहे. भारताने दोन सामन्यातून 4 गुण घेतले आहेत. प्रत्येकी गटातील आघाडीचे दोन संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील.