कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड येथील रस्ता करण्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड शेतवडीमधील रस्ते करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बबन देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली माजी ग्रा. पं. अध्यक्ष गजानन पाटील व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत ग्रामीणच्या आमदार व कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना नुकतेच निवेदन दिले. यावेळी ग्रामस्थांतर्फे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कंग्राळी बुद्रुक शेतवाडीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पक्के रस्ते न झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतातील कामे वेळेवर व व्यवस्थित होण्यासाठी शेतातील रस्ते पक्के होण्याची गरज आहे.
पावसाळ्यात तर पायवाट व गाडी मार्गावर गुडघाभर चिखल असल्याने दुचाकी, बैलगाड्या चिखलामध्ये रुतून बसत असल्यामुळे शेताकडे जाणे कठीण होत आहे. यासाठी पुढील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
1) नागेश पवार यांच्या घरापासून भेकणे शेतीपर्यंत तसेच मार्कंडेय नदी ते अलतगा पुलापर्यंत पक्का रस्ता करणे.
2) मार्कंडेय नदी काठावरील लघु पाणीपुरवठा कार्यालयापर्यंत तसेच जाफरवाडी पुलापर्यंत पक्का रस्ता करणे.
3) कॅनरा बँकेपासून किगदी तलावापर्यंत पक्का रस्ता करणे.
4) गैंडवाड येथील महात्मा गांधी हायस्कूलपासून मार्कंडेय नदीपर्यंत पक्का रस्ता करणे.
पक्के रस्ते करताना आवश्यकतेनुसार मोरी (लहान पूल) बांधणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी कालव्याची निर्मिती करणे.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निवेदन स्वीकारुन शेतवडीतील रस्त्यांची पाहणी करून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी बबन देसाई, गजानन पाटील, आनंद चव्हाण, नारायण पाटील, कल्लाप्पा पाटील, रमेश कडोलकर, जोतिबा हुरुडे, यल्लाप्पा पाटील, नागेश हुरुडे, शंकर पाटील, आप्पाजी पाटील, सुनिल कागणकर, भाऊराव भेकणे, महादेव चिखलकर, प्रकाश चिखलकर, चिदंबर चिखलकर, मोनाप्पा सुतारसह बरेच शेतकरी उपस्थित होते.