महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण : कुपवाडा येथे पार पडला सोहळा
वृत्तसंस्था/ कुपवाडा
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) 41 राष्ट्रीय रायफल्स (मराठा एलआय)मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या पुतळ्याचे मंगळवारी अनावरण केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणे ही गर्वाची बाब असल्याचे उद्गार शिंदे यांनी यावेळी काढले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याकरिता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुपवाडा येथे पोहोचल्यावर भारतीय सैनिकांचा उत्साह पाहण्याजोगा होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सुमारे 2200 किलोमीटरचे अंतर कापून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचला आहे. कुपवाडा येथे स्थापन केल्या जाणाऱ्या पुतळ्याला नेणाऱ्या वाहनाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा झेंडा दाखवून मुंबई येथून रवाना केले होते. ही यात्रा महाराष्ट्रातून सुरू होत एक आठवड्यानंतर कुपवाडा येथे पोहोचली. कुपवाडा येथे पुतळा स्थापन करण्यापूर्वी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड येथून माती अन् पाणी आणून त्यासाठी भूमिपूजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून याची निर्मिती आम्ही पुणेकर फौंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या सहकार्याने करण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये जम्मू-काश्मीरच्या मराठा रेजिमेंटकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे स्थापन करण्यात आले होते. यातील एक पुतळा एलओसीनजीक समुद्रसपाटीपासून 14,800 फुटांच्या उंचीवर आहे.