220 रुपये प्रतिकिलो : निवडणुकीचा परिणाम, वाढत्या दराचा फटका
बेळगाव : निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याने ओल्या पार्ट्यांना रंग चढू लागला आहे. त्यामुळे चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने भर उन्हाळ्यात चिकनच्या दराचा भडका उडाला आहे. 160 रु. किलो दराने विकल्या जाणाऱ्या चिकनचा दर 220 रु. प्रति किलो झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर अनेक अडचणी वाढल्या आहेत. मटणाचा दर प्रति किलो 680 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे मांसाहार खवय्ये चिकनला अधिक पसंती देतात. मात्र आता चिकन दरातदेखील हळुहळू वाढ होऊ लागली आहे. 160 वरून चिकनचा दर 220 रुपयांपर्यंत गेला आहे. वाढत्या उन्हात मागणी कमी होऊन दरात घट होते. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात दरात वाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसायावर परिणाम
निवडणुकीमुळे पार्ट्यांना जोर आला आहे. विशेषत: तरुण मंडळींकडून पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे दर वाढले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. जिल्ह्यात दहा हजाराहून अधिक पोल्ट्री फार्म आहेत. त्यामुळे ब्रॉयलर कोंबड्याचे उत्पादनदेखील अधिक आहे. मात्र उष्णतेमुळे कोंबड्या दगावण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा दरावर परिणाम होऊ लागला आहे. वाढलेली मागणी आणि ब्रॉयलर केंबडी उत्पादनात झालेली घट यामुळे दरात वाढ झाली आहे.
यंदा परिस्थिती उलट
उन्हाळ्यात चिकन खाण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे मागणी कमी होऊन दरदेखील घटतात. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली आहे. वाढत्या उष्म्याबरोबर चिकनचे दरदेखील वाढू लागले आहेत. पोल्ट्री फार्ममधून कोंबड्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे पुरवठाही कमी होऊ लागला आहे. परिणामी बाजारात चिकनचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे खवय्यांना भर उन्हाळ्यात चिकनच्या अधिक दराचा फटका सहन करावा लागत आहे.