वाहन चालकांची कसरत, वाहतूक पोलिसांची सर्कस
वार्ताहर/ कराड
पुणे-कोल्हापूर लेनवरील कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुल पाडण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरीगेटींग करण्याचे काम सुरू आहे. मात्र पहिल्याच दिवशी कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. कोल्हापूर-पुणे लेनवरील वाहतूक दिवसभर संथ गतीने सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. तर वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची अक्षरशः सर्कस झाली.
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. कराडलाही सहापदरी कामाला सुरूवात होत आहे. या अंतर्गत कोल्हापूर नाका येथे सहा पदरी नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी याठिकाणी पुणे-कोल्हापूर लेनवर असलेला जुना उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे. प्रशासनाने हा पूल पाडण्याची तयारी सुरू केली आहे.
पूल पाडताना महामार्गावरील वाहतुक सुरक्षित व सुरळीत सुरू रहावी, यासाठी उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिगेट्स लावण्यात येत आहेत. रविवारी पुणे-मुंबईला जाणाऱया वाहनांची महामार्गावर मोठी गर्दी असते. त्यातच बॅरिगेटींग केल्याने कोल्हापूर नाक्यावर रविवारी वाहतूक विस्कळीत झाली. पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक दिवसभर अत्यंत संथ गतीने सुरू होती. त्यामुळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक पोलिसांची दमछाक
कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी दिवसभर कोल्हापूर नाक्यावर तैनात होते. तर ठेकेदार कंपनीचे चार सुरक्षा रक्षकही वाहतूक पोलिसांच्या सोबत होते. पुणे-कोल्हापूर लेनवरील वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र मलकापूर येथील पादचारी उड्डाण पुलापासून मुख्य उड्डाण पुलाला बॅरिगेटींग केल्याने कोल्हापूर-पुणे लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
कोल्हापुर नाका ते ढेबेवाडी फाटा दरम्यानच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर एकीरी वाहतूक करण्यात आली होती. तरीही कोल्हापूर-पुणे लेनवरील वाहतूक व स्थानिक वाहतूक यामुळे कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची बोंबाबोंब झाली. पोलीस असतानाही केवळ कोंडीमुळे रविवारी कोल्हापूर नाक्यावर वाहने घासण्याचे किरकोळ अपघात झाले. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक झाली.
महामार्ग पोलीस गायब
वास्तविक पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील वाहतुक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांची आहे. रविवारी दिवसभर कोल्हापूर नाक्यावर वाहतुक कोंडीचा खेळ सुरू असताना महामार्ग पोलीस मात्र तिकडे फिरकले नाहीत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱया हजारो प्रवासी व वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागला.