चिपळूण
थकलेले घरभाडे मागितल्याच्या रागातून तरुणाने एका वृध्दावर थेट कोयतीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मार्गताम्हाने-उगवतवाडी येथे मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर त्या वृध्दाच्या गळातील 75 हजाराची चेनही त्या तरुणाने चोरली. वृध्दावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणी तरुणावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य महादेव मोरे (मुळ-गुढे, सध्या मार्गताम्हाने-उगवतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद हल्ला झालेल्या चंद्रकांत रामाजी चव्हाण (78, मार्गताम्हाणे-उगवतवाडी) यांनी दिली. या बाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत चव्हाण हे मार्गताम्हाने-उगवतवाडी येथे एकटेच रहात असून त्याच्या शेजारी भाडेकरु राहतात. त्यांच्या चौथ्या भाडय़ाच्या खोलीत महादेव मोरे व त्यांचा मुलगा आदित्य मोरे राहतात. महादेव मोरे यांच्याकडून चंद्रकांत चव्हाण यांना 18 हजार रुपये भाडय़ापैकी 7 जानेवारी रोजी 4 हजार रुपये घरभाडे मिळाले. उर्वरित 14 हजार रुपये घरभाडे येणे बाकी आहे. महादेव मोरे हे त्याचे मुळ गाव गुढे येथे राहत असताना त्याच्या खोलीत आदित्य हा एकटाच राहतो. 10 रोजी दुपारी 12 च्या सुमारास आदित्य मोरे हा चंद्रकांत चव्हाण यांच्या घरी आला. त्यावेळी त्यास चव्हाण यांनी थकलेल्या घरभाडय़ाची विचारणा केली असताना याचा त्याला राग आला व त्याने चव्हाण यांच्या घरातील कोयतीने त्यांच्या डोक्यात हल्ला केला. यानंतर चव्हाण गंभीर जखमी झाले. ते गंभीर जखमी अवस्थेत असताना आदित्यने त्यांच्या गळय़ातील 75 हजार रूपये किंमतीची चेन चोरुन नेली. या घटनेनंतर चव्हाण यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.