ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान खूनाची घटना घडल्याने खळबळ
प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील सोनी येथे तरुणाच्या डोक्यात धारधार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. आकाश माणीक नरुटे (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत तरुणाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून, निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने त्याची शोधाशोध केल्यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळा. आकाश याच्या डोक्यात पाठिमागील बाजूस व पाठिवर धारदार हत्याराने अनेक वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. आकाश यास दुचाकीवर बसवून नेणारे दोघेजण फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी गावातील काहिजणांना ताब्यात घेऊन चाैकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.