घटप्रभा पोलिसांची कारवाई : 11 दुचाकी जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
एका अट्टल मोटारसायकल चोराला घटप्रभा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सव्वातीन लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली.
संतोष घुळाप्पा पाटील (वय 32, रा. तुक्कानट्टी, ता. गोकाक) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने वेगवेगळय़ा ठिकाणांहून चोरलेल्या 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
23 जुलै 2022 रोजी रात्री घटप्रभा येथील कीर्ती बारसमोर उभी करण्यात आलेली केए 49 ई 9188 क्रमांकाची मोटारसायकल चोरण्यात आली होती. या प्रकरणी 27 जुलै रोजी मल्लापूर पी. जी. येथील महांतेश बसवाणी संकेश्वर यांनी घटप्रभा पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक श्रीशैल बॅकोड, महिला पोलीस उपनिरीक्षक एम. सी. हिरेमठ, एस. आर. कणवी, आर. आर. गिड्डप्पगोळ, एम. बी. करणी, बी. एस. नाईक, के. आर. बबलेश्वर, आर. एम. पडतरे, आर. पी. कुकटोळी, एच. के. मल्लाडदावर आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. संतोषने आणखी कोठे चोरी केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.