वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी मंगळवार, 26 मार्च रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची हाक आम आदमी पक्षाचे (आप) नेते गोपाल राय यांनी दिली आहे. या घेरावोमध्ये पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली. आम आदमी पक्षाच्या या आवाहनामुळे पंतप्रधानांच्या निवासस्थानाला अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आंदोलकांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी गृह मंत्रालयाकडून दक्षता घेतली आहे.
मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना गुऊवारी रात्री अटक करण्यात आली आहे. ईडी कोठडीमुळे केजरीवाल सध्या तिहार कारागृहात असून आपचे कार्यकर्ते रस्त्यावरील लढाई लढताना दिसत आहेत. केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध म्हणून त्यांच्या समर्थकांनी यंदा होळीही साजरी केली नाही. सोमवार, 25 मार्चला होळीच्या दिवशी पक्षाच्यावतीने कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता.