यमगर्णीनजीक दुर्घटना : तांदळाचा ट्रक उलटला : ट्रक-आयशरमध्ये अपघात : दोन्ही वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
प्रतिनिधी / निपाणी
यमगर्णी येथे महामार्गावर समोरून जाणाऱया आयशरला ट्रकची जोराची धडक बसल्याने ट्रक उलटला. यामुळे तांदळाची पोती महामार्गावर विखुरल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात ट्रक आणि आयशर वाहनाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास येथील बसस्थानकानजीक महामार्गावर घडला.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, ट्रक (जीजे एव्ही 9276) हा तांदळाची पोती भरून बेंगळूरहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान यमगर्णा बसस्थानकानजीक आल्यानंतर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने समोरून जाणाऱया आयशरला (एमएच 04-9504) या ट्रकची जोराची धडक बसली. यावेळी तांदळाची पोती महामार्गावर विखुरली. तर मागून धडक बसल्यानंतर आयशर वाहन सुमारे 500 मिटर अंतरावर जावून थांबले. यावेळी सदर अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने सर्वांची धावपळ उडाली.
ट्रकचालक मनोहरलाल पठाण व क्लीनर भारतलाल धोंडा (रा. राजस्थान) हे दोघेजण किरकोळ जखमी झाले. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी जयहिंद कंपनीचे कर्मचारी प्रकाश बामणे, बसवेश्वर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंदा केरीकट्टी यांच्यासह सहकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली.
घटनास्थळी मोठी गर्दी
दरम्यान, अपघातानंतर ट्रकमधील तांदळाची पोती महामार्गावर विखुरल्याने एका बाजूची वाहतूक सुमारे तीन तास रोखून ठेऊन एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. यानंतर क्रेनच्या साहाय्याने गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करताना दुभाजकावर तांदळाची पोती एकत्रित करताना वाहतूक सुरू करण्यात आली. अपघातातील जखमींना 108 रुग्णवाहिकेतून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक आनंदा कॅरीकट्टी करीत आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.