राज्यभरात पहिल्याच रात्री 31 जणांना पकडले
प्रतिनिधी /पणजी
मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱया चालकांना रोखण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात कारवाई करून अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून रात्रीची मद्यपान तपासणी मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी पहिल्याच रात्री 31 वाहनचलकांना मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत पकडण्यात आले. मेरशी सर्कलजवळ पहिल्या एका तासात 10 जण सापडले. रात्री 10 वाजल्यापासून विविध ठिकाणी पोलीस पथके तैनात करून सदर मोहिम राबवण्यात येत असून ती कायम ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या मोहिमेसाठी वाहतूक पोलिसांनी एकूण 10 पथके तैनात केली असून उत्तर गोवा जिह्यात 5 तर दक्षिण गोवा जिह्यात 5 अशी पथके कार्यरत आहेत. रोज रात्री 10 वाजल्यानंतर विविध ठिकाणी रस्त्यावर अचानकपणे ती पथके वाहचालकांची अल्कोमीटरने तपासणी करणार आहेत. चालकांने मद्यप्राशन केले की नाही हे पाहिले जाणार आहे. मद्यप्राशन केल्यास चालकाला चलन देण्यात येणार आहे. या प्रकरणात रूपये 10 हजार दंड, तीन महिने वाहन परवाना निलंबित व 6 महिने कैद अशी कारवाई होणार आहे.
अपघात वाढल्याने कारवाइ&
अलिकडच्या काळात गोव्यातील वाहन अपघात मोठय़ा प्रमाणात वाढले असून त्यांत अनेकांचे बळी जात आहेत. त्याची दखल घेऊन सरकारच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांविरोधात ही मोहिम आखली आहे. वाहनांचे सुमारे 95 टक्के अपघात हे मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने होतात असा निष्कर्ष वाहतूक पोलिसांनी काढला असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी मद्यपी वाहनचलकांवर कारवाई करण्याची ही मोहीम राबविण्यात आली आहे.
वाहतुकीचे नियम अटी यांचे उल्लंघन करणाऱयांना देखील या मोहिमेत पकडण्यात येणार असून त्यांच्यावर कारवई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिली.
या मोहिमेमुळे मद्यपी वाहनचालकांना चाप बसेल आणि अपघात टळतील तसेच निष्पाप बळी वाचतील, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यातील प्रमुख मार्गावर ही मोहीम राबवणार असल्याचे उपअधीक्षक आंगले यांनी सांगितले.