प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी विविध ठिकाणी मोहीम राबविताना बेकायदा मासे, फळे, भाजीपाला यांची विक्री करणाऱया विक्रेत्यांवर कारवाई करून साहित्य जप्त केले तसेच एक बेकायदा व्यवसाय करणारा हातगाडा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मार्केट निरीक्षक सांतो फर्नांडिस यांनी दिली.
जुने पिकअप स्थानक येथून मासे जप्त करण्यात आले, जुन्या हरी मंदिराजवळून केळीविक्री करणारा हातगाडा जप्त केला गेला. मालभाट येथील बिग जी मॉल, पाजीफोंड येथून फळे जप्त करण्यात आली. पाजीफोंड येथील अनाथाश्रमाला जप्त करण्यात आलेले मासे देण्यात आले, तर हातगाडा पालिकेच्या बागेत ठेवण्यात आला आहे. स्टेशन रोडवरून भाजीपाला जप्त करून तो पालिका कार्यालयात ठेवण्यात आला आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.