नवी दिल्ली
अदानी समूहातील समभागांमध्ये मंगळवारच्या सत्रात तेजीचा माहौल दिसून आला आहे. जवळपास 13 दिवसांच्या प्रवासानंतर अदानी एंटरप्रायजेसचे समभाग तब्बल 15 टक्क्यांनी मजबूत राहिल्याचे पहावयास मिळाले. साधारणपणे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कंपनीचे समभाग 223.50 रुपयांच्या तेजीसोबत 1,796.95 रुपयांवर पोहोचले होते. यावेळी अदानी पोर्टही 8 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये अदानी ट्रान्समिशन व अदानी विल्मरमध्ये जवळपास 5 टक्क्यांची तेजी होती. सिमेंट कंपन्यांमध्ये एसीसी व अंबुजा सिमेंट यांचे समभाग 3 टक्क्यांनी वधारले. अदानी टोटल गॅस 5 टक्क्यांनी व अदानी पॉवर हे 0.5 टक्क्यांनी नुकसानीत राहिले होते.
काय आहे तेजीचे कारण
अदानी समूहाच्या प्रमोटर्सने सोमवारी जवळपास 9 हजार कोटी रुपयाचे कर्जाचे पेमेंट कालावधीच्या 19 महिने आधीच केले होते. याचा परिणाम कंपनीच्या समभागांवर तेजी राखण्यासाठी झाला होता.