ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाले. मात्र, आढळराव-पाटील शिवसेनेच आहेत. ते उपनेते म्हणूनच कार्यरत राहतील. सामना दैनिकातील बातमी अनावधानाने छापण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.
शिवसेनेतून बंड करुन भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यावेळी शिवसेना उपनेते आढळराव-पाटील यांनीही सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो कुठेही टाकला नाही. त्यामुळे पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आता पक्षाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आढळराव-पाटील यांचा पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात मोठा वाटा आहे. 2004 मध्ये ते शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. आता आढळराव-पाटील शिवसेनेचे उपनेते म्हणून कार्यरत आहेत.