972 महाविद्यालयांतून लवकरच प्रवेशप्रक्रिया सुरू
पुणे : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेशप्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार असून, यंदा 972 आयटीआय महाविद्यालयातून 1 लाख 49 हजार 268 इतक्या जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.
दहावीच्या निकालानंतर आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश दिले जातात. अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागासाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. आयटीआयचे एकूण 95 ट्रेड आहेत. आयटीआयची राज्यात 419 शासकीय व 553 खासगी महाविद्यालये आहेत. यापैकी शासकीय महाविद्यालयात 93 हजार 904, तर 55 हजार 364 खासगी जागा उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जागेत किंचित घट झाली आहे. गतवर्षी 1 लाख 50 हजार 204 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली होती. तसेच सन 2020 मध्ये 1 लाख 47 हजार 696 जागा उपलब्ध होत्या.
ट्रेडनुसार उपलब्ध जागांमध्ये इलेक्ट्रिशियनसाठी सर्वाधिक 22 हजार 380 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर फिटरसाठी 20840 आणि वेल्डरसाठी 18 हजार 860 जागा उपलब्ध आहेत. जिल्हानिहाय जागांमध्ये पुणे जिल्ह्यातील खासगी व शासकीय महाविद्यालयांमध्ये 12 हजार 344 जागा उपलब्ध आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी 920 जागा उपलब्ध असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.