पुणे / प्रतिनिधी :
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार (RTE) 25 टक्के राखीव जागांवर राज्यातील नियमित निवड यादीतील 62 हजार 814 विद्यार्थ्यांनी, तर प्रतीक्षा यादीतील 15 लाख 641 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मिळून तब्बल 78 हजार 455 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ही प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळांमध्ये झालेल्या प्रवेशाची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता राज्यातील नऊ हजार 86 शाळांनी नोंद केली होती. या शाळांमधील एक लाख एक हजार 906 जागांसाठी तब्बल दुप्पट म्हणजेच दोन लाख 82 हजार 783 अर्ज आले होते. प्रवेश प्रक्रियेत 90 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड यादी पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली. त्यातील 62 हजार 814 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेला सातत्याने मुदतवाढ देण्यात येत होती. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शनिवारपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील 15 हजार 641 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
हेही वाचा : कदम, अडसूळ यांचीही पक्षातून हकालपट्टी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कारवाई