जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकोद्गार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे बुधवारी 96 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.
लालकृष्ण अडवाणी हे प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे प्रतीक आहेत. त्यांच्या योगदानामुळे आमचा देश बळकट झाला आहे. अडवाणी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने राष्ट्रीय प्रगती आणि एकतेला चालना मिळाली आहे. अडवाणी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना करतो. राष्ट्रउभारणीच्या दिशेने अडवाणी हे 140 कोटी भारतीयांना प्रेरित करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
अडवाणी यांना स्वत:चे अथक परिश्रम आणि संघटन कौशल्याद्वारे पक्ष वाढविला आणि कार्यकर्त्यांना घडविले आहे. भाजपच्या स्थापनेपासून सत्तेवर येईपर्यंत अडवाणी यांचे अतुलनीय योगदान प्रत्येक कार्यकत्यासाठी प्रेरणेचा स्रोत असल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत.
निरंतर परिश्रम आणि संघर्षातून अडवाणी यांनी भाजपच्या विचारसरणीला देशभरात पोहोचविले आहे. राष्ट्र आणि संघटनेला समर्पित त्यांचे कार्य आम्हा सर्व कार्यकर्त्यांची प्रेरणा असल्याचे भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे.