वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेले सहा दिवस देशभरात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याचे एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये तो त्याच्या फ्लॅमधून पहाटे तीन ते चार वाजण्याच्या कालावधीत घरातून तीनदा बाहेर पडताना दिसून आला आहे. त्याच्या हातात मोठी बॅग असून श्रद्धा वालकर हिच्या मृतदेहाचे तुकडे त्या बॅगेत होते, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी फुटेज जप्त केले असून पुढील चौकशी सुरू आहे. त्याचप्रमाणे मृत श्रद्धा वालकर हिचे कपडे, मोबाईल आणि तिचा खून ज्या हत्याराने करण्यात आला ते शस्त्र यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक दल हिमाचल प्रदेशच्या पार्वती घाटीतील तोष या गावी गेले आहे.
दिल्ली पोलीस पुरावा गोळा करण्यासाठी दिल्लीतील वनभागांमध्ये खोदाई करीत आहे. याच वनभागात विविध ठिकाणी आफताबने श्रद्धा हिचे तुकडे पुरल्याची कबुली दिली आहे. श्रद्धाचे शीर अद्याप सापडलेले नाही. हरियाणातील गुरुग्राम येथे काही ठिकाणी पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी केली.
बेदम मारहाण
श्रद्धा वालकर हिला आफताब बेदम मारहाण करीत असे. वसई येथे ती त्याच्यासह राहत असताना अनेकदा त्याने तिला मारहाण करून जखमी केले होते. एकदा तेथील रुग्णालयात तिला मारहाणीमुळे दाखल करण्यात आले होते. श्रद्धा वालकर हिचा एक व्हॉटस्अप चॅटही पोलिसांच्या हाती लागला असून त्यात श्रद्धा आपल्याला मारहाण झाल्याचे सांगत असल्याचे दिसून येते. आपल्याला इतक्या जखमा झालेल्या आहेत की अंथरुणातून उठताही येत नाही. आज आपण कामावर जाणार नाही, आपला रक्तदाब वाढलेला आहे आणि शरीर ठणकत आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे आफताब विरोधात भक्कम प्रकरण उभे करण्याचा निर्धार दिल्ली पोलिसांनी केला आहे. कायदे तज्ञांच्या मते श्रद्धाचे शीर सापडले नाही तरीही सकृत दर्शनी पुराव्यांच्या आधारे आफताबला देहदंडाची शिक्षा होऊ शकते.
आज आफताबची नार्को चाचणी
दिल्ली न्यायालयाच्या आदेशानुसार आज रविवारी आफताब पुनावाला या क्रूरकर्म्याची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीत आरोपी खोटे बालू शकत नाही. तसेच काहीही लपवूही शकत नाही. त्यामुळे गुन्हय़ाचे अन्वेषण करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते. या चाचणीत आफताब पुनावाला कशाची कबुली देतो यावर तपासाची पुढची दिशा अवलंबून असेल, असे स्पष्ट होत आहे.