400 हून अधिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम ः काही तासांनंतर सेवा पूर्ववत
वॉशिंग्टन डीसी / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या नागरी विमानवाहतूक प्रशासनाच्या संगणकांमध्ये समस्या उद्भवल्याने त्या देशातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून ही सेवा प्रभावित होऊ लागली होती. सुरुवातीच्या टप्प्यात 93 विमाने रद्द करण्यात आली असून ही संख्या आणखी वाढून 400 पर्यंत जाईल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच काही तासांनंतर सेवा पूर्ववत झाल्याने विमान प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अमेरिकेतून विदेशांमध्ये जाणाऱया विमानांवरही या समस्येचा परिणाम झाला आहे. 500 आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे प्रलंबित झाली आहेत. संगणकीय यंत्रणा पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लॉस एंजल्स येथे अनेक विमाने रद्द झाल्याने प्रवाशांना विमाततळावरच रात्र काढावी लागली. अनेक प्रवासी विमानाच्या धावपट्टीवरच झोपले, अशीही माहिती देण्यात आली.
सायबर हल्ल्याची चर्चा
विमानसेवा विस्कळीत झाल्याची माहिती अमेरिकेच्या नागरी वाहतून विभागाने ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. या संदेशात सविस्तर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, नंतर प्रशासनाने अडचण दूर करण्यासाठी अहोरात्र काम केले. हे कार्य अद्यापही सुरु आहे. अजून या संगणकीय यंत्रणेत दुरुस्ती करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. कोणत्यातरी बाहय़ शक्तीने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे यंत्रणा बिघडली असावी असा आरोपही केला जात आहे. सर्व शक्यता गृहित धरुन या प्रकरणाचा तपास केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
समस्या काय आहे ?
प्रवासी विमानांचे उड्डाण आणि त्यांचे अवतरण (लँडिंग) यांची नोंद संगणकावर नोंद केली जाते. पण या नियंत्रक संगणकाचे कामकाजच बिघडल्याने विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विमान आणि संगणक यांच्यातील संपर्क तुटल्याने ही नोंद संगणकावर होईनाशी झाली आहे. तथापि, पर्यायी यंत्रणेचा उपयोग करुन विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्नही केला जात आहे, अशी माहिती आहे.