नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नवजात बालकांना त्यांच्या जन्मप्रमाणपत्रासोबतच आधार क्रमांकही दिला जाणार आहे. ही सुविधा येत्या काही महिन्यांमध्ये निर्माण करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा 16 राज्यांमध्ये आहे. तिचा विस्तार येत्या काही कालावधीत देशभर केला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) या संस्थेने ही योजना तयार केली आहे. सध्याच्या प्रक्रियेनुसार पाच वर्षांच्या आतल्या बालकाची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. त्याची माहिती त्याच्या मातपित्यासह नोंद केली जाते. त्यामुळे बालक 5 वर्षांच्या वरचे झाले की त्याची बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करावी लागते. तसेच वयाच्या 15 व्या वर्षीही त्याची बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी लागते. यापुढे जन्मप्रमाणपत्रासह आधार क्रमांक दिला जाईल. नंतर या आधार कार्डावरील माहिती बालकाच्या वाढत्या वयानुसार अद्ययावत केली जाईल. यामुळे जन्मानंतर काही काळाने आईवडिलांना बालकाच्या आधार कार्डासाठी धडपड करावी लागणार नाही, त्यामुळे ही नवी व्यवस्था सुविधाजनक आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.