वृत्तसंस्था/ पुणे
येथे सुरू असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी ताजिकिस्तानचा टॉप सीडेड ग्रॅण्डमास्टर फारूख ऍमोनातोव्हने नवव्या फेरी अखेर गुणतक्त्यात 7.5 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या नवव्या फेरीतील लढतीत ग्रॅण्डमास्टर ऍमोनातोव्हने रशियन ग्रॅण्डमास्टर सॅव्हचेंकोचा 43 व्या चालीत पराभव करत पूर्ण गुण वसूल केला. नवव्या फेरीतील अन्य एका लढतीत भारताच्या दीप सेनगुप्ताने ग्रॅण्डमास्टर निकीटेंकोचा तसेच भारताच्या अर्जुन कल्याणने कार्तिक वेंकटरामनचा, ऍलेक्सांड्रोव्हने नेग्युयेनचा पराभव केला. नवव्या फेरीअखेर अर्जुन कल्याण, दीप सेनगुप्ता आणि ऍलेक्सांड्रोव्ह हे प्रत्येकी 7 गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत. या स्पर्धेतील आणखी दोन फेऱया बाकी आहेत. भारताची ग्रॅण्डमास्टर दिव्या देशमुखने 6.5 गुण नोंदविले आहेत.