जमिनीतच स्वीमिंग पूल अन् हॉटेल
पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, जेथे लोक जमिनीखाली आलिशान घरे तयार करून राहत आहेत. एका शहरात रुपांतरित झालेल्या या ठिकाणी जमिनीखाली आधुनिक शहराप्रमाणेच सर्वप्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागात कूबर पेडी नावाचे शहर वसविण्यात आले आहे.
या शहरापर्यंत पोहोचल्यावर केवळ वाळवंटसदृश जमीन दिसून येते. परंतु या जमिनीखाली आलिशान आयुष्य जगण्यासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यात स्वीमिंग पूल, हॉटेल, चर्च समवेत अनेक भव्य रेस्टॉरंट देखील सामील आहे. कूबर पेडी हे अत्यंत उष्ण ठिकाण आहे. येथे हिवाळय़ातही उष्ण वातावरण असते आणि पाऊस कमी प्रमाणात पडतो. याचमुळे लोक जमिनीखाली राहणे पसंत करतात. येथे 24 तास जरी पाऊस पडला तरीही पूरसदृश स्थिती निर्माण होते.
सुमारे 3500 लोकांची वस्ती असलेल्या या शहरात सुमारे 45 देशांचे लोक वसलेले आहेत. यातही 60 टक्के लोक हे मूळचे युरोपचे आहेत. कमी लोकसंख्या असूनही हे शहर स्वतःची अद्भूत संस्कृती आणि राहणीमानामुळे लोकांच्या पसंतीचे ठिकाण ठरले आहे. येथील लोकांच्या उत्पन्नाचे साधन पर्यटन आणि खाणी आहेत.
या शहरातील लोक रात्रीच्या वेळी क्रीडाप्रकारांचा आनंद घेतात. येथील गोल्फ कोर्स अत्यंत लोकप्रिय आहे. या शहरात केवळ भूमिगत घरेच नव्हे तर हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत. येथील घरांमध्ये आलिशान सुविधा दिसून येतात. काही काळापूर्वी लोकांना विजेच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता येथील लोकांनी सौर प्रकल्प आणि पवनऊर्जा प्रकल्प स्थापन करून वीजपुरवठा निश्चित केला आहे.