मानवी चेहरा अन् सिंहाचे शरीर
पुरातत्वतज्ञांना दक्षिण इजिप्तच्या केना प्रांतात डेंडेराच्या मंदिरात एक महत्त्वाचा शोध लागला आहे. संशोधकांनी उत्खननादरम्यान येथे स्फिंक्ससारखी दिसणारी मूर्ती शोधून काढली आहे. याचबरोबर येथे एका तीर्थस्थळाचे अवशेष आणि रोमन-युगाचा शिलालेख मिळाला आहे. हा शोध रोमन सम्राट क्लॉडियसचे राज्य आणि बायजेंटाइन युगावर प्रकाश टाकणारा आहे. स्फिंक्स सारखी दिसणारी ही प्रतिमा हसणाऱया व्यक्तीची आहे. हा क्लॉडियसचा चेहरा असल्याचे मानले जात आहे.
क्लॉडियसला ख्रिस्तपूर्व 54 ते 41 दरम्यान रोमन साम्राज्याचा उत्तर आफ्रिकेत विस्तार करणारा राजा म्हणून ओळखले जाते. ही मूर्ती रोमन साम्राज्याशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. परंतु शिलालेखाचे विस्तृत अध्ययन केल्यावरच यासंबंधी स्पष्ट माहिती मिळू शकणार आहे. येथे आढळून आलेले तीर्थस्थळ या क्षेत्रातील इतिहासाचे पुरावे देणारे आहे. चुनादगडावरील डिझाइन बायजेंटाइन काळाचा प्रभाव दर्शविते.
रोमन काळातील शिलालेख एक उल्लेखनीय शोध असून तो संबंधित काळ आणि संस्कृतीचे दर्शन घडवितो. शिलालेखावर अनेक प्राण्यांचे चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यासंबंधी अधिक जाणून घेतल्यावर या भागाविषयी आणि प्राचीन संस्कृतीविषयी अधिक माहिती मिळू शकेल. अशाप्रकारचा शोध संबंधित काळातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक संरचनांवरही प्रकाश टाकत असो. इजिप्तचे सरकार आता या नव्या शोधाद्वारे अधिक संख्येत पर्यटकांना आकर्षित करू इच्छिते.
स्फिंक्स म्हणजे काय?
स्फिंक्स हा इजिप्तच्या पौराणिक कथांमधील एक प्राणी आहे. या प्राण्याला मानवी शीर असते. तर उर्वरित शरीर हे सिंहाचे असते आणि याला पंख असतात. प्राचीन इजिप्तच्या मंदिर आणि अन्य महत्त्वपूर्ण इमारतींच्या प्रवेशद्वारावर याचे पुतळे उभारले जायचे. स्फिंक्सची सर्वात प्रसिद्ध मूर्ती गीझाच्या पिरॅमिड कॉम्पलेक्समध्ये आहे. ही मूर्ती 20 मीटर लांबीची आहे. ग्रेट स्फिंक्सची निर्मिती फिरौन खाफरेच्या शासनकाळात ख्रिस्तपूर्व 2500 साली झाल्याचे मानले जाते.