वृत्तसंस्था/ अलेक्सझांड्रिया (इजिप्त)
विश्व कुस्ती फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या मानांकन आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा मल्ल अंकित गुलिया आता कांस्यपदकासाठी लढत देईल. दरम्यान, ग्रीकोरोमन प्रकारात भारताच्या साजन बनवाला तसेच अन्य काही भारतीय महिलांचे आव्हान समाप्त झाले आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी ग्रीकोरोमन प्रकारातील 72 किलो वजनगटात झालेल्या रिपचेज फेरीच्या लढतीत भारताच्या अंकित गुलियाने किर्गीस्तानच्या युलुचा तांत्रिक गुणावर पराभव केला. आता गुलिया कांस्यपदकासाठी लढत देईल. पुरुषांच्या 77 किलो वजनगटात भारताच्या साजन बनवालाला तुर्कीच्या युनुस बसेरकडून 0-7 अशा गुणफरकाने एकतर्फी हार पत्करावी लागली. 67 किलो गटात भारताच्या आशुला किर्गीस्तानच्या रझाककडून कांस्यपदकासाठीच्या प्लेऑफ लढतीत पराभव पत्करावा लागला. भारताच्या रोहित दाहियाला 82 किलो वजनगटात पात्रफेरी गाठता आली नाही. स्वीडनच्या बर्गने दाहियाचा पराभव केला. 87 किलो वजनगटातील कांस्यपदकासाठीच्या प्लेऑफ लढतीत ऑस्ट्रियाच्या मार्कुस रेगीनजेरने भारताच्या नरेंद्र चिमावर तांत्रिक गुणावर मात केली. 130 किलो हेवीवेट गटात चीनच्या मेंगने भारताच्या नवीनचा पराभव केला.
महिलांच्या विभागात 57 किलो वजनगटात बल्गेरियाच्या इव्हेलिना जॉर्जिव्हा निकोलिक्हाने भारताच्या सिटोला पराभूत केले. तसेच 62 किलो गटात बल्गेरियाच्या मिमी रिस्टोव्हाने भारताच्या सुमित्रावर मात केली. 68 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत झेकच्या ऍडेलाने भारताच्या राधिकाचा तांत्रिक गुणावर पराभव केला. 76 किलो गटात कांस्यपदकासाठी आता भारताच्या किरणचा सामना कझाकस्तानच्या इल्मेराबरोबर होणार आहे. इजिप्तमधील या स्पर्धेत भारताचे अव्वल मल्ल सहभागी झालेले नाहीत.