क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स रेसिडेन्सियल स्कूल मैदानावर बेळगाव ग्रामीण अकादमी व एमसीसीसी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओम साई चषक 14 वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत अण्णा मोगने सहारा अकॅडमी कोल्हापूर संघाने किंग्स अकादमी संघाचा 71 धावांनी तर रॉजर क्रिकेट क्लबने कोल्हापूर संघाचा 39 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. ऋषी वासा कोल्हापूर, श्रेया पोटे रॉजर क्रिकेट अकादमी सामनावीर ठरले.
ओम साई चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी ग्रा. पं. उपाध्यक्ष सुरेश बिर्जे, भोमाण्णा पोटे, हुसेन गोकाक, प्रा. अलका पाटील, महांतेश गवी, गौस हाजी, सुरेश जाधव कोल्हापूर, विनायक मुचंडीकर, फुरकान मुल्ला, सुनील देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सामन्यात अण्णा मोगने सहारा अकादमी कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात 7 बाद 162 धावा केल्या. ऋषी वासाने 5 चौकारासह नाबाद 53, अर्णव पाटीलने 3 चौकारासह 27, आयुष जतकरने 3 चौकारासह 26 धावा केल्या. किंग्ज अकादमीतर्फे वीरन पाटीलने 3 तर प्रज्वलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल किंग्स अकादमी संघाचा डाव 21 षटकात सर्व बाद 91 धावात आटोपला. संकेत नाकाडीने 3 चौकारासह 22, प्रतीक कारेकरने 2 चौकारासह 19 धावा केल्या. मोगनेतर्फे साईराज कदमने 6 धावात 3 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात रॉजर क्रिकेट क्लबने अण्णा मोगने कोल्हापूर संघाचा 39 धावानी पराभव केला.