सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण : कंत्राटदाराकडून वापरास मान्यता
प्रतिनिधी /पणजी
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून झुआरी पुलावर बांधण्यात येणाऱया आठ पदरी केबल स्डेड पुलाचा एक भाग वाहतुकीसाठी सज्ज झाला असून त्यासंबंधी आजच्या मुक्तीदिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत घोषणा करण्याची शक्यता आहे. सदर पूल डिसेंबरच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याची शक्यता यापूर्वी वर्तविण्यात आली होती.
सदर पुलाच्या पूर्ण झालेल्या चौपदरी भागाच्या गुणवत्ता आणि अन्य सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून आता तो कधीही कार्यन्वित करण्यासाठी तयार असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱया दिलीप बिल्डकॉन कंपनीने सरकारला सांगितले आहे.
चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण
हल्लीच या पुलाचे लोड टेस्टिंग करण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येकी 32 टन वजनाची 32 वाहने वापरून ही चाचणी करण्यात आली. त्यावेळी बोलताना साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी सदर भाग डिसेंबरच्या अखेरीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार आता दिलीप बिल्डकॉनने पुलाच्या वापरास परवानगी दिली आहे.
अत्त्याधुनिक, आकर्षक पूल
सुमारे 640 मीटर लांब असलेला केबल-स्टेड ब्रिज प्रत्येकी चार लेनच्या दोन भागात विभागला गेला आहे. त्याच्या चार लेनच्या भागात प्रीकास्ट स्लॅबसह 53 स्ट्रक्चरल स्टील सेगमेंट आणि 112 केबल्स आहेत. त्याच्या चार लेनचे क्लोजर सेगमेंट गत ऑगस्ट महिन्यात घालण्यात आले होते.
हलक्या वाहनांसाठी एकेरी मार्ग
या पूर्ण झालेल्या लेनमधून हलक्या वाहनांना केवळ एकेरी म्हणजेच मडगाव ते पणजी अशी वाहतूक करता येणार आहे. अवजड वाहनांना दोन्ही बाजूनी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. पणजीतून मडगावला जाणारी हलकी वाहने विद्यमान जुन्या पुलावरून प्रवास करू शकणार आहेत. दुसरी चौपदरी लेन मार्च 2024 पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.