वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथील दि भाग्योदय मल्टिपर्पज सोसायटीने 2021-22 सालामध्ये 64 लाख रुपये निव्वळ नफा मिळविला. संस्था भागधारकांना 20 टक्के लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष ए. डी. पाटील यांनी सांगितले. गेल्या रविवारी संस्थेची 28 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एम. जाधव, संचालक आर. आय. पाटील, एस. जी. मुतगेकर, जी. जी. कंग्राळकर, वाय. आर. पाटील, एम. व्ही. जाधव, रमेश कांबळे, संभाजी पाटील, लता पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लक्ष्मी-सरस्वती फोटो पूजनानंतर सभेला सुरुवात करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक कै. एम. आय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सल्लागार एम. एन. पाटील यांनी केले. प्रास्ताविक करताना शिवाजी मुतगेकर यांनी, संस्थेने गेल्या 28 वर्षांमध्ये केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. सेक्रेटरी के. एम. पाटील यांनी नफा-तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन करून ठरावाला मंजुरी मिळवून घेतली.
भाग्योदय पुरस्काराने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव
या सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून दहावी, बारावी, डिप्लोमा, बी. ए., बी. कॉम., बी.एस्सी., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., एम. बीए., बीई, एम. टेक., एमबीबीएस आदी परीक्षांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणी मुलांना मान्यवरांच्या हस्ते भाग्योदय पुरस्कार व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सल्लागार एन. बी. मोहनगेकर यांची कन्या निवेदिता ही सी. ए. परीक्षेत विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच संस्थेचे भागधारक संजय पाटील यांची कन्या ऋतू हिची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटकातून निवड झाल्याबद्दल भाग्योदय विशेष पुरस्कार व शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे संचालक, सल्लागार, भागधारक व कर्मचारी यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सल्लागार, भागधारक, भाग्योदय महिला सोसायटीच्या संचालिका, सल्लागार, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. संचालक जी. जी. कंग्राळकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष के. एम. जाधव यांनी आभार मानले.