श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने आणखी एक ‘गगनभरारी’ घेतली आहे. शनिवारी सकाळी 11.56 वाजता पीएसएलव्ही-सी54 मिशनचे प्रक्षेपण केले. तामिळनाडूतील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलेले हे उड्डाण यशस्वी झाले असून याअंतर्गत 9 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आले आहेत. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल रॉकेटचे हे 56 वे उड्डाण आहे.
इस्रोकडून ओशनसॅट-3 सह 8 नॅनो म्हणजेच लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. रॉकेटने 321 टन पेलोडसह उड्डाण केले. यामध्ये 7 ग्राहक उपग्रह, एक ओशनसॅट-3 हा राष्ट्रीय उपग्रह आणि भूतानसोबत संयुक्तपणे तयार केलेला भूतानसॅट हा राजनयिक उपग्रह यांचा समावेश आहे. हा 30 सेमी घन उपग्रह भूतानच्या अभियंत्यांनी तयार केला आहे. त्याचे वजन 15 किलो आहे. ओशनसॅट-3 हा 1000 किलो वजनाचा उपग्रह आहे. हा उपग्रह समुद्र आणि पृथ्वीचा पृ÷भाग आणि वातावरणाचा अभ्यास करणार आहे. याशिवाय भारताच्या सागरी क्षेत्रासह मित्र देशांच्या सागरी भागातील क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषणाची तपासणी करण्यास मदत करेल. या सॅटेलाईटमुळे संभाव्य चक्रीवादळाची माहिती मिळू शकेल, त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.
‘भूतानसॅट’ ः संयुक्त उपग्रह
ओशनसॅट व्यतिरिक्त या प्रक्षेपणात आठ नॅनो सॅटेलाईट म्हणेज छोटे उपग्रहही अंतराळात पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपग्रह भूतानसॅट हा आहे. भूतानसॅट हा भारत-भूतानचा संयुक्त उपग्रह आहे. हा उपग्रह छोटा असून जमीन, रस्ते, रेल्वे ट्रक, पूल यासंबंधित माहिती गोळा करण्यास त्याची मदत होईल.
सर्वात लांब मोहिमांपैकी एक
इस्रोची ही मोठी मोहीम मानली जात आहे. पीएसएलव्ही-सी54 या रॉकेटने उपग्रहांना दोन कक्षेत सोडले आहे. उड्डाणानंतर 20 मिनिटांनी ओशनसॅट उपग्रह पृथ्वीपासून 742 किमी उंचीवर सोडला गेला. शास्त्रज्ञ याला आतापर्यंतच्या सर्वात लांब मोहिमांपैकी एक मानत आहेत. प्रक्षेपणाच्या 20 मिनिटांनंतर, ओशन-सॅट पृथ्वीपासून 742 किमी उंचीवर विलग झाला. त्यानंतर 516 ते 528 किमी अंतरावर इतर उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. हे संपूर्ण मिशन 8 हजार 200 सेकंद म्हणजेच 2 तासांपेक्षा जास्त काळ चालले. इस्रोच्या आतापर्यंतच्या सर्वात लांब मोहिमांपैकी हे एक आहे.