पेडणे पोलिसांची कारवाई, चोरटय़ांच्या कोठडीत वाढ, आश्वे-मांद्रेसह हरमल भागात चोरीच्या घटना
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी 25 लाखांचा तर काल 10 लाखांचा चोरीचा ऐवज हस्तगत केला. या दोन चोरी प्रकरणी दोन संशयित चोरटय़ांना अटक केली आहे. मागच्या दोन महिन्यापासून आश्वे-मांदे आणि हरमल या भागातील विविध ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणात चोरी झाल्याच्या घटना पेडणे पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आल्या होत्या.
या चोरीप्रकरणी पेडणे पोलिसांनी संशयित लतीफ खान (वय 28, रा. म्हैसूर कर्नाटक) व के. एस. अजीज के सदू (वय 47, रा. कोडगू कर्नाटक) या दोन युवकांना मागच्या 8 दिवसापूर्वी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 25 लाखांचा ऐवज जप्त केला होता. त्यानंतर काल पुन्हा अधिक चौकशीनंतर त्यांच्याकडून 10 लाखांचा ऐवज जप्त केला. या कारवाईनंतर आतापर्यंत या प्रकरणात 35 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.
पेडणे पोलिसांनी तपास करतेवेळी संशयित हे केरळ आणि कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली. कर्नाटक आणि केरळ पोलिसांच्या मदतीने अशा आंतरराज्य कारवाईत अनेक चोरीच्या गुह्यांमध्ये सामील असलेल्या आंतरराज्य घरफोडी रॅकेटचा पर्दाफाश केला आणि संशयितांना अटक केली.
पेडणे पोलिसांनी हस्तगत केलेल्या ऐवजामध्ये विविध ब्रँडचे तेरा लॅपटॉप, विविध ब्रँडचे 15 मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, कॅमेरे यांचा समावेश असून आतापर्यंत अंदाजे 35 लाखांचा ऐवज पेडणे पोलिसांनी जप्त करण्यास यश मिळवले आहे.
संशयितांना पेडणे पोलिसांनी सात दिवसांची कोठडी घेतली. आतापर्यंत 7 तक्रारी चोरीच्या नोंद झाल्या आहेत. त्याचा तपास लागल्याची माहिती पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली. अजूनही संशयितांकडून काही चोरीचा माल मिळतो की नाही यांचा तपास चालू असल्याचे निरीक्षक विक्रम नाईक यांनी सांगितले.
पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सुमेधा नाईक, कॉस्टेबल राजेश एसी, सागर खोरजुवेकर, प्रज्योत मयेकर, विशाल नाईक, परब यांनी ही कारवाई केली. पेडणे पोलीस उपधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधीक्षक सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे विक्रम नाईक यांनी सांगितले.