युक्रेनच्या खासदाराचा दावा ः समुद्राची देवता उगवतेय सूड
युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याला सातत्याने झटके बसत आहेत. मोस्कवा युद्धनौकेच्या जलसमाधीच्या धक्क्यातून सावरण्याआधीच रशियाच्या आणखीन एया युद्धनौकेला युक्रेनने लक्ष्य केले आहे. काळोखात युक्रेनने रशियाच्या युद्धनौकेवर हल्ला केला आहे. काळय़ा समुद्रात पुतीन यांची एक अत्याधुनिक युद्धनौका ‘संकटात’ असल्याचा दावा कौन्सिल ऑफ ओडेसाचे प्रमुख ओलेक्सी गोंचारेंको यांनी केला आहे.
ओडेसामध्येच युक्रेनचा सर्वात मोठा नौदलाचा तळ आहे. गोंचारेंको यांनी ऍडमिरल मकारोव्हचे नुकसान झाल्याचा दावा स्वतःच्या टेलिग्राम चॅनेलवर केला आहे. 500 दशलक्ष डॉलर्सची (38 अब्ज रुपये) ही फ्रिगेट केवळ 5 वर्षांपूर्वीच रशियाच्या नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. शनिवारी रात्री ऍडमिरल मकारोव्हवर संकट ओढवले, स्नेक आयलँडनजीक युक्रेनच्या क्षेपणास्त्रांनी युद्धनौकेवर हल्ला केल्याचे गोंचारेंको म्हणाले.
रशियाकडून बचावाचे प्रयत्न
बचावकार्याशी संबंधित जहाज आणि विमाने काळय़ा समुद्रातील रशियाचे सर्वात मोठे बंदर सेस्तोपोलमधून रवाना झाली आहेत. मकारोव्हचे नुकसान झाले असल्यास रशियासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जाणार आहे. अलिकडेच रशियाची महाशक्तिशाली युद्धनौका मोस्कवा समुद्रात बुडाली होती.
रशियाचे मौन
रशियन नोदलाची गस्त फ्रिगेट ऍडमिरल मकारोव्हचे नुकसान झाले आहे. समुद्राची देवता युक्रेनच्या गुन्हेगारांचा सूड उगवत आहे. युद्धनौकेचे मोठे नुकसान झाले असली तरीही अद्याप ती बुडालेली नसल्याचे गोंचारेंको यांनी म्हटले आहे. रशियाने या दाव्याची पुष्टी केलेली नाही तसेच तो फेटाळला देखील नाही. मकारोव्ह ही ऍडमिरल ग्रिगोरोविच-क्लास फ्रिगेट असून रशियाच्या नौदलाच्या सर्वात नव्या युद्धनौकांपैकी एक आणि काळय़ा समुद्रात असलेली सर्वात अत्याधुनिक फ्रिगेट आहे.