बंगळूरात चाललेल्या भाजपविरोधी पक्षांच्या एकजूटीच्या बैठकीत विरोधी आघाडीचे नाव INDIA (इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इनक्लुझिव्ह अलायन्स) असण्यावर एकमत झाले आहे. तसेच पुढील बैठक ही मुंबईत होणार असून पुढची दिशा या बैठकीत ठरवली जाणार असल्याची माहीती काँग्रेसचे अध्यक्ष आणि बैठकीचे आयोजक मल्लिकार्जून खरगे यांनी माध्यमांना सांगितली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा मुकाबला करण्यासाठी देशभरातील 26 पक्ष एकत्र येत आहेत. या भाजपविरोधाची पहीली सभा पाटण्यात झाली. त्यानंतर 17 आणि 18 जुलैला ती बंगळूरमध्ये झाली. या बैठकीला काँग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, आप, शिवसेना- ठाकरे गट, राष्ट्रवादी- शरद पवार, आरजेडी यांच्यासह अनेक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले कि, “बंगळूरमध्ये होत असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) असे म्हटले जाईल. या पुढील निवडणूक प्रचार रणनिती ठरवण्यासाठी एक दिल्लीत सचिवालय स्थापन करण्यात येईल. तसेच विरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत होईल.” असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना काँग्रेस अध्यक्षांनी 11 सदस्यीय समन्वय समितीचीही घोषणा केली असून सदस्यांच्या नावांवर मुंबईच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले आहे.