महापालिकेच्या कारवाईने दुकानदार धास्तावले
प्रतिनिधी / बेळगाव
प्लास्टिक वापरण्यावर निर्बंध घालण्यासाठी महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक विरोधात मोहीम राबविली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. खासबाग परिसरात गुरुवारी अनेक स्वीटमार्ट तसेच विविध दुकानांमध्ये जाऊन तपासणी करण्यात आली. यावेळी काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कुलकर्णी गल्ली, खासबाग, जुने बेळगाव, ओल्ड पी. बी. रोड, खासबाग आणि वडगाव परिसरात काही स्वीटमार्ट तसेच इतर ठिकाणी जाऊन प्लास्टिकविरोधात धाडी घालण्यात आल्या आहेत. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव डुमगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यात आली आहे.
मोहीम तीव्र करणार
प्लास्टिक वापरामुळे विविध समस्या उद्भवत आहेत. विशेष करून प्लास्टिकच्या पिशव्या जनावरे खात आहेत. त्यामुळे त्यांना आजार होत आहेत. याचबरोबर गटारींमध्ये प्लास्टिकचा कचरा अडकून गटारी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहात आहे. कुठेही प्लास्टिक फेकून देण्यात येत आहे. त्यामुळे शहरामध्ये कचऱ्याचे ढीग पडून रहात आहेत. त्यामुळे आता प्लास्टिकविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.