रामचंद्र मोदगेकरांची शरद पवारांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या दाव्याला गती मिळावी यासाठी उपाययोजना करून अतिरिक्त वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी माजी केंद्रीयमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दाव्यातील वकील हरिष साळवे लंडनमध्ये स्थायिक आहेत. ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव व संतोष काकडे सर्वोच्च न्यायालयातील दाव्यासाठी हजर रहात आहेत. उच्चाधिकार व तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक झाली आहे. बऱयाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ऑगस्ट महिन्यात सीमाप्रश्नाची सुनावणी झाली. या दाव्याला बळकटी मिळावी, यासाठी उच्चाधिकार व तज्ञ समितीची बैठक बोलावून सर्व समस्या दूर करण्याची मागणी मोदगेकर यांनी केली. यावेळी शरद पवार यांनी आपण यामध्ये लक्ष घालू, असे आश्वासन दिले.